तारा : राज्यातील महाविकास आघाडीचं चुकून स्पेलिंग मिस्टेक झालं असून ते महाभकास आघाडी असल्याची टीका साताऱ्यातील भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी केली. काँग्रेसने या आधी फक्त सत्ता भोगली आणि लोकांची कामं केली नाहीत, पण मोदी (Narendra Modi) सत्तेत आले आणि त्यांनी शेतकरी आणि मजुरांसाठी अनेक योजना लागू केल्या असंही उदयनराजे म्हणाले. नरेंद्र मोदी यांना दैवी शक्ती लाभली आहे, त्यांच्या कामात अनेक बारकावे असतात अशीही स्तुतीसुमनं उधळली.
काँग्रेसने फक्त घोषणा दिल्या
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उदयनराजे यांच्या प्रचारार्थ साताऱ्यात सभा झाली. त्यावेळी उदयनराजे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्तुती करत काँग्रेसवर टीका केली. ते म्हणाले की, देशात नव्हे तर जगभरात सर्वात मोठा पक्ष म्हणजे भाजप आहे. काँग्रेसच्या काळात फक्त निवडणुकीसाठी गरिबी हटाव सारख्या घोषणा देण्यात आल्या. पण मतदान झाल्यानंतर त्यांनी मतदारांकडे पाठ फिरवली. त्या घोषणांची अंमलबजावणी ही नरेंद्र मोदींनी केली.
आज देशाची सुरक्षा ही नरेंद्र मोदींमुळे असल्याचं उदयनराजे म्हणाले. ते म्हणाले की, देशातला शेतकरी आज सुखी आणि सक्षम आहे तो नरेंद्र मोदींमुळे. मोदी हेच देशाचं उज्ज्वल भविष्य आहेत. नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवरायांचे विचार अंमलात आणले. जगभरात आज देशाचं नावलौकीक झालं ते फक्त मोदींमुळे. दुसऱ्या बाजूला काँग्रेस आहे. देशाचा पंतप्रधान कोण असावा यावर विरोधकांच्या आघाडीमध्ये वाद होतोय.